मोहाली – आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा डकवर्थ लुईस पद्धतीने 7 धावांनी पराभव करत पंजाबच “किंग्ज’ ठरला. कोलकाता संघासमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य होते. मात्र पावसामुळे खेळ थांबला तेव्हा संघ 16 षटकांत 7 बाद 146 धावा करून संघर्ष करत होता. मात्र, 16 व्या षटकानंतर खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाबला 7 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. पंजाबच्या विजयात भानुका राजपक्षेने केलेल्या अर्धशतकाचा वाटा मोठा होता.
Not the beginning we wished for, but we will bounce back…🙌#PBKSvKKR #AmiKKR #KKR #TATAIPL 2023 pic.twitter.com/d0JYOQXvQI
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2023
कोलकाताकडून अष्टपैलू आंद्रे रसेलने 19 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. तर व्यंकटेश अय्यर 28 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळाडूने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने 17 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर दुसरीकडे पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक फलंदाज बाद केले. अर्शदीपने 3 षटकांत 19 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय सॅम करण, नॅथन एलिस, सिकंदर रझा आणि राहुल चहर यांना 1-1 यश मिळाले.
तत्पूर्वी, कोलकाताचा कर्णधार राणाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. पंजाबसाठी भानुका राजपक्षेने 32 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
याशिवाय पंजाबचा कर्णधार शिखर धवनने 29 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. कोलकाताकडून टीम साऊदीने सर्वाधिक 2 बळी घेतले. उमेश यादवशिवाय सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 असे यश मिळाले.
आधी लाईट, नंतर पावसाचा व्यत्यय
पंजाबने केकेआरची अवस्था 7 बाद 146 धावा अशी केली असताना पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबविण्यात आला. अर्थात सामना थांबवण्याची ही दुसरी वेळ होती. पहिल्यांदा मोहालीमधील आय. एस. बिंद्रा स्टेडियमवरील फ्लड लाईट सुरू होण्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने पंजाबच्या फलंदाजीनंतर सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा केकेआरला 24 चेंडूत विजयासाठी 46 धावांची गरज होती. परंतु त्यांनी 7 विकेट गमाविलेल्या होत्या. त्यामुळे पंजाबला 7 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज : 20 षटकांत 5 बाद 191 (भानुका राजपक्षे 50-32 चेंडू, शिखर धवन 40, सॅम करण 26*; टीम साऊदी 2-54, वरुण चक्रवर्ती 1-26, उमेश यादव 1-27) विजयी वि. कोलकाता नाईट रायडर्स : 16 षटकांत 7 बाद 146 (व्यंकटेश अय्यर 34, नितीश राणा 24, आंद्रे रसेल 35; अर्शदीप सिंग 3-19, राहुल चहर 1-12, सिकंदर रझा 1-25)