चंडिगढ – पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी सुमारे 68 टक्के मतदान झाले. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. पंजाबची सत्ता कुणाकडे जाणार हे समजण्यासाठी 10 मार्चला जाहीर होणाऱ्या निकालापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. त्या जागांसाठी एकूण 1 हजार 304 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानामुळे त्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. पंजाब निवडणुकीला यावेळी बहुरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सत्तारूढ कॉंग्रेसपुढे सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे.
त्या राज्यात कॉंग्रेस आणि आपमध्ये मुख्य लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसे असले तरी इतर पक्षही तुल्यबळ आहेत. शिरोमणी अकाली दल आणि बसपची युती ताकदीने निवडणुकीला सामोरी गेली. त्याशिवाय, भाजप, पंजाब लोक कॉंग्रेस आणि एसएडी(संयुक्त) आघाडीनेही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
संयुक्त समाज मोर्चा या शेतकरी संघटनांच्या आघाडीने राजकीय मैदानात उडी घेत निवडणुकीची रंगत आणखीच वाढवली. पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी जाहीर होणार आहे.