नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचा पंजाबातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मंगळवारी जाहीर केला जाणार आहे असे या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आम्ही लोकांकडून मते मागवून आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आम्ही 13 जानेवारील जनमताचा कौल घेतला आहे.
मोबाईल फोन वरून हा जनमताचा कौल घेण्यात आला. ते म्हणाले की भगवंत मान हे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्हावेत अशी माझी व्यक्तीगत इच्छा होती, पण स्वत: मान यांनी लोकांनाच आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवू द्या अशी सूचना केल्याने आम्ही ही जनमत चाचणी घेतली.
या चाचणीचा निष्कर्ष आम्ही उद्या दुपारी 12 वाजता जाहीर करू असे त्यांनी घोषित केले. आमच्या निवडीचा सर्व पंजाबला अभिमान वाटेल असा दावाही केजरीवालांनी केला आहे.