शारजा – कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेले 150 धावांचे आव्हान किंग्ज इलेव्हन पंबाजने मनदीप सिंग व ख्रिस गेल यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर सहज पार केले. पंजाबातर्फे मनदीप सिंगने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली तर गेलने 29 चेंडूत 51 धावा कुटल्या. यामुळे पंजाबने हा सामना 7 चेंडू शिल्लक असतानाच जिंकला.
वेगवान गोलंदाज महंमद शमी, फिरकी गोलंदाज रवी बिष्णोई यांच्यासह ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंबाजने कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 9 बाद 149 धावांवर रोखले व वर्चस्व राखले.
पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. संघाची धावसंख्या केवळ एक झालेली असताना मॅक्सवेलने भरात असलेल्या नितीश राणाला बाद केले.
या धक्क्यातून कोलकाता सावरला नाही. शमीने राहुल त्रिपाठी व दीनेश कार्तिक यांना एकाच षटकात बाद करत कोलकाताची अवस्था 3 बाद 10 अशी बिकट केली. त्यानंतर शुभमन गीलने कर्णधार इयान मॉर्गनच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली.
मॉर्गन 25 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर गीलने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुन्हा एकदा सुनील नरेन, कमलेश नागरकोटी व पॅट कमिन्स यांनी निराशा केल्याने त्यांचा डाव परत घसरला. त्याचवेळी वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात गीलही बाद झाला. त्याने आपल्या 57 धावांच्या खेळीत 45 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
तळात लॉकी फर्ग्युसनने केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली. त्याने 13 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 24 धावांची खेळी केली. पंजाबकडून शमीने 3 तर, बिष्णोई व जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 9 बाद 149 धावा. (शुभमन गील 57, इयान मॉर्गन 40, लॉकी फर्ग्युसन नाबाद 24, महंमद शमी 3-35, रवी बिष्णोई 2-20, ख्रिस जॉर्डन 2-25).