नवी दिल्ली – पंजाब विधानसभा निवडणूक थोड्याच दिवसात होणार आहे. त्याआधी एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री माही गिल निवडणूकिच्या रिंगणात उतरणार असून ती भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने गेल्या वर्षी काँग्रेसचा केला प्रचार केला होता.
पंजाबमधील सर्व 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, अभिनेत्री माही गिल आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त माहीने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि पंजाबमध्ये तिचे मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहेत.
देव डी अभिनेत्रीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेस उमेदवार हरमोहिंदर सिंग लकी यांचा प्रचार केला होता. यादरम्यान तिला राजकारणात येण्याबाबत प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, लकी तिचा बालपणीचा मित्र आहे आणि ती फक्त त्याला साथ देत होती. राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. असे माहीने सांगितले होते.
माहीने गुलाल, आगे से राइट, दबंग, साहेब बीवी और गँगस्टर, पान सिंग तोमर, दबंग 2, साहेब बीवी और गँगस्टर्स रिटर्न्स, जंजीर, दुर्गामती यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. माही गिलचे खरे नाव रिम्पी कौर गिल आहे. माही पंजाबी कुटुंबातील असून ती चंदिगडची आहे.
2009 मध्ये रिलीज झालेल्या अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ या चित्रपटाने माही गिलला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. या चित्रपटानंतर माहीने अनेक पुरस्कारही जिंकले. हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच माहीने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.