चंदीगड – पंजाबातील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आणखी 25 नवीन आम आदमी क्लिनिक सुरू केली असून या क्लिनिकचे आज लोकार्पण करण्यात आले असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी येथे सांगितले.
या क्लिनिकद्वारे आम्ही राज्यातील सर्व सामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देत आहोत. काल पंधरा ऑगस्टला राज्याच्या विविध भागात एकूण अशा प्रकारची 75 क्लिनिक उघडण्यात आली आहेत. आजच्या 25 क्लिनिकमुळे त्यांची एकूण संख्या आता शंभर झाली आहे.
लवकरच राज्याच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारचे दवाखाने सुरू केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. दर्जेदार आरोग्य सेवा देऊन पंजाबला निरोगी आणि रोगमुक्त राज्य बनवण्याचा राज्य सरकारचा हा नम्र प्रयत्न आहे, असे मान यांनी येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील रहिवाशांना यापुढे उपचार आणि निदान सुविधांसाठी रुग्णालयात पैसे खर्च करावे लागणार नाहीत असे ते म्हणाले. मान म्हणाले की या क्लिनिकमध्ये लोकांना सुमारे 100 क्लिनिकल चाचण्यांसह 41 पॅकेजेस मोफत दिली जातील.