राहुरी -करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचा लॉकडाऊनचा आदेश जारी केला आहे. मात्र तो आदेश धुडकावून लावत राहुरी पोलीस ठाणे हद्दीत विनाकारण मोटरसायकलवर फिरत असताना काही नागरिक आढळून आले. अशा दहा ते पंधरा जणांवर पोलीस पथकाने दंडात्मक कारवाई म्हणून त्यांच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक गणेश शेळके, उपनिरीक्षक राहुल सानप यांनी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग, शनीचौक आदी भागात बंदोबस्त लावून तसेच राहुरी पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली.रस्त्याने मोटरसायकलवर फिरणाऱ्या लोकांची कसून चौकशी करण्यात आली. दुपारपर्यंत दहा ते पंधरा मोटरसायकली जप्त करून ताब्यात घेतल्या होत्या. तर दुपारनंतरही ही कारवाई सुरूच होती. त्यामुळे दुपारनंतर राहुरी शहरात शांतता दिसून आली.