नगर, -सहकार नगर येथे निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने झालेल्या रास्ताची कामे सार्वजनिक बांधकामाचे शाखा अभियंता बापूसाहेब वराळे यांच्या निदर्शनास आणून देत चुकीच्या पद्धतीने कामे करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागात आ. जगताप यांनी सहकार नगर मधील चुकीच्या पद्धतीने झालेल्या रास्ताच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, कैलास येवले, प्रशांत चौधरी, अभिजित खोसे, बाबा वाडकर, संभाजी पवार, शेखर तुंगार यांच्यासह स्थानीक नागरिक उपस्थित होते.
यावेळी जगताप म्हणाले, सपकाळ हॉस्पिटल परिसर, सहकार नगर मधील रास्तची कामे प्रलंबित आहे. मात्र, अनेक कामे ही चुकीची व निकृष्ट दर्जाची झाली असल्याची तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे केली होती. त्यानंतर आम्ही तेथील सर्व परिस्थितीची पाहणी केली.
त्यानंतर आज तातडीने या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सहकार नगर मधील तातडीने कामे मार्गी लावा. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यावर तातडीने कारवाई करा. अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा जगताप यांनी दिला.