पुणे – “पुनीत बालन सेलेब्रिटी लीग’चा (पीबीसीएल) पहिल्या सीझनमध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खेळाडूंचा लिलाव सोहळा झाला.
मागील काही दिवसांपूर्वी युवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी घोषित केलेल्या “पुनीत बालन सेलेब्रिटी लीग’चा (पीबीसीएल) पहिला सीझन लवकरच पुण्यात होणार आहे. यावेळी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते “पीबीसीएल’च्या ट्रॉफीचे अनावरण झाले. यावेळी पुनीत बालन, शोभा आर. धारिवाल, जान्हवी आर. धारिवाल, संगीतकार अजय-अतुल, विनोद सातव आदी उपस्थित होते.
या लिलावात एकूण 104 खेळाडूंचा लिलाव आयकॉन्स, प्लॅटिनम आणि गोल्ड अशा तीन विभागांत झाला. प्रत्येक खेळाडूची बेस प्राइज 1 लाख पॉईंट्स असलेल्या या लिलावात सर्वाधिक 42 लाख पॉईंट्सची बोली उतुंग ठाकूर यांच्यावर लागली. त्यांना तोरणा टायगर्सने टीममध्ये घेतले.
शिखर ठाकूर यांना पन्हाळा पॅंथर्सने 35 लाख पॉईंट्स, शिवनेरी लायन्सने संदीप जुवटकर यांना 31 लाख पॉईंट्स, सिद्धांत मुळे यांना प्रतापगड वॉरिअर्सने 27 लाख पॉईंट्स, तर तेजस नेरूरकर यांना 25 लाख पॉईंट्स देत सिंहगडने आपल्या टीममध्ये घेतले. इतर खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठीही सर्व टीम कॅप्टन्समध्ये चुरस रंगली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले. तर, लिलाव प्राक्रियेचे सूत्रसंचालन राहुल क्षीरसागर यांनी केले.
गेल्यावर्षी “पीबीसीएल’ घेण्याचे आमचे ठरले होते. परंतु, करोना प्रादुर्भावामुळे शक्य झाले नाही. मराठी चित्रपटसृष्टी या महामारीच्या धक्क्यातून सावरत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच “पीबीसीएल’च्या निमित्ताने मराठी कलाकार मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत सहा संघ असतील, टी 10 चा फॉरमॅट असेल. “पीबीसीएल’चा यंदा पहिला सीझन असून, या स्पर्धेत दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.
– पुनीत बालन, युवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते
स्टॅंडिंग ओवेशनमुळे भारावले युसुफ पठाण
कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. कार्यक्रमात यानिमित्ताने “स्टॅंडिंग ओवेशन’ दिल्याने चाहत्यांच्या या प्रेमामुळे युसुफ पठाण भारावून गेले. क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मैदानाबाहेर तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे आपण आयुष्यात काहीतरी कमावले असल्याचे समजले. आमच्या चाहत्यांनी आमच्यावर केलेले प्रेम हीच आमची संपत्ती असल्याचे पठाण म्हणाले. माझी मराठी थोडी कच्ची असली तरी संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.