मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेकडून टाळण्यात आले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. सुनील शिंदे यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी पक्षाकडून देण्यात आलेल्या उमेदवारीवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना, “रामदास कदम देखील शिवसेनेचे नेते आणि कडवट शिवसैनिक आहेत. ते अनेक वर्षे आमदार आणि मंत्री होते. सुनिल शिंदे हे देखील कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडून त्याग केलाय,” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
तसेच “सुनिल शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. तेही कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचं नेतृत्व केलं. सुनिल शिंदे वरळीचे आमदार होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी ती जागा सोडली. हा त्यांचा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या त्यागाचं निष्ठेचं स्मरण ठेवलं आणि त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर आणण्यासाठी उमेदवारी दिली.” असेही संजय राऊत म्हणाले.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने रामदास कदम यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्यावर बोलणं टाळलं. ते म्हणाले, “रामदास कदम यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केले आहे. ते अनेक वर्षे आमदार होते, अनेक वर्षे मंत्री होते. विधान परिषदेत देखील त्यांनी पक्षाचं नेतृत्व केले आहे.
रामदास कदम मार्दर्शकाच्या भूमिकेत राहणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी मी काय मार्गदर्शक आहे का? असा प्रति प्रश्न विचारला. “आम्ही पक्षाचं नेतृत्व आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा सर्वांना पक्षाच्या नेतेपदी नेमलं आहे. आम्ही अनेक वर्षे पक्षाचे काम करतो. कुणी नाराज होण्याचं कारण नाही,” असेही संजय राऊत यांनी नमूद केले .