पारनेर -पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरातील लॉकडाऊन असूनही अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलिसांनी नवी पेठ, बसस्थानक चौक परिसरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना लाठ्यांचा प्रसाद देत उठाबशा काढण्याची शिक्षा देऊन दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागतही केले आहे.
बुधवारी (दि.1) सायंकाळी पाचच्या सुमारास पोरनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, हेड कॉन्स्टेबल अशोक निकम हे गस्त घालत असताना त्यांना नवीपेठ व बसस्थानक चौकात काही तरुण विनाकारण फिरत असल्याचे दिसले. त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना दंडुक्याचा प्रसाद देत उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तसेच पुन्हा रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्याची तंबी दिली.तसेच निघोज येथील ठोक किराणा विक्रेता जास्त पैसे घेऊन मालाची विक्री करत असल्याची तक्रार एका ग्राहकाने कामगार तलाठी विनायक निंबाळकर यांच्याकडे केली.
निंबाळकर यांनी तातडीने दुकानात जात दुकानदाराला याबाबत जाब विचारला. पठारवाडी परिसरात शेतीची कामे करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा या भागातील मजूर मोठ्या संख्येने आले आहेत. मात्र देशात लॉकडाऊन केल्यानंतर ते अडकून पडले आहेत. याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळताच त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
तसेच मुलिकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र महाराज सुपेकर यांनी तत्काळ जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत शाळेच्या पंधरा खोल्या या मजुरांसाठी उपलब्ध करून दिल्या. या मजुरांना मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टतर्फे किराणा देण्यात येणार आहे. कन्हैया दूध उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम लंके यांनीही त्यांना बाजरीची पोती देण्याचे आश्वासन दिले. दत्तात्रय घोगरे यांनी स्वयंपाकाची जबाबदारी घेतली आहे.