#उन्नाव: ‘हैद्राबाद एन्काऊंटर प्रमाणेच शिक्षा द्या’; पीडितेच्या वडिलांची मागणी

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांची मागणी

नवी दिल्ली : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यामुळे देशात असा गुन्हा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी हेच पाऊल उचलले पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिने काल रात्री अखेरचा श्‍वास घेतला. आता माझ्या मुलीच्या आरोपींना हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींप्रमाणेच शिक्षा द्या, अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितीच्या वडिलांनी केली आहे.

उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती 90 टक्‍क्‍यांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात आली. यानंतर प्रतिक्रिया देताना तिच्या वडिलांनी हैदराबादमधील आरोपीप्रमाणेच आपल्या मुलीच्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली.

दरम्यान, आपल्याला मुलीच्या मृत्यूची सुचना देण्यात आली नव्हती, असेही तिच्या वडिलांकडून सांगण्यात आले. तसेच आरोपींना हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच शिक्षा देणअयात यावी किंवा त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. एका हिंदी वृत्तवाहिनीला त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.