‘हॅलो फॉरेस्ट’ला मिळतोय पुणेकरांचा प्रतिसाद

जिल्हाभरातून दरमहा येताहेत 200 कॉल्स : वनसंरक्षण आणि संवर्धनासाठी मदतीचे आवाहन

पुणे – वनसंपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या “हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागाच्या या हेल्पलाइनवर जिल्ह्यातून प्रतिदिवस पाच ते सहा कॉल येत असून, महिन्याला येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण तब्बल दोनशेहून अधिक असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे.

वृक्षारोपण, वनसंवर्धन यासह वन्यप्राण्यांची अवैध शिकार, अतिक्रमण, वणवा आदी मुद्यांवर नागरिक आणि वनविभाग यांच्यामध्ये थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी वनविभागातर्फे “हॅलो फॉरेस्ट-1926′ या हेल्पलाइनची सुरूवात करण्यात आली आहे. 24 तास आठवड्याचे सातही दिवस ही सुविधा उपलब्ध आहे, असे उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांनी सांगितले आहे. विशेषत: वणवा, वन्यप्राण्यांची शिकार, अपघात आणि माहिती विचारण्यासाठी मोठ्या प्रमाणात “कॉल’ येत असल्याचे श्रीलक्ष्मी यांनी सांगितले आहे.

या हेल्पलाइनमुळे एका कॉलवरुन मदत मागता येते आणि वनखात्याला मदतही करता येते. यापूर्वी शिकार, अवैध वृक्षतोड आदीची माहिती देताना नागरिकांना भीती असायची. मात्र, या हेल्पलाइनमध्ये नाव आणि नंबर गुप्त ठेवले जातात. त्यामुळे अनेकजण आता माहिती देण्यासाठी समोर येत आहेत. या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. तो अधिकारी माहिती देणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळ आदी विचारुन लगेच कारवाईसाठी करण्यासाठी बांधील असतो. यात वनाधिकारी कुठेही टाळाटाळ करू शकत नाहीत, कारण हा कॉल वरिष्ठस्तरापर्यंत नोंद केला जातो. येणाऱ्या कॉलचा मागोवा घेतला जातो. त्यामुळेच हॅलो फॉरेस्टबाबत नागरिकांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण झाली असून, इतर नागरिकांनीही या सुविधेचा वापर करून वनसंरक्षण आणि संवर्धनासाठी मदत करावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)