ऑनलाइन मिळकतकरास पुणेकरांची पसंती

संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ


एकूण कर भरणाऱ्या मिळकतींपैकी


50 ते 55 टक्‍के जणांकडून प्राधान्य

पुणे – महापालिकेचा मिळकतकर ऑनलाइन भरण्यास पुणेकरांकडून पसंती दिली जात आहे. दरवर्षी ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून एकूण कर भरणाऱ्या मिळकतींमध्ये हे प्रमाण 50 ते 55 टक्‍के असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नागरिकांना आपला कर एका क्‍लीकवर भरता यावा यासाठी बॅंका, महापालिकेचे संकेतस्थळ तसेच पेटीएम, फोन पे, भीम यासारख्या ऑनलाइन वॉलेटवरही कर भरण्याची सुविधा दिली आहे. तसेच, हे व्यवहारही सुरक्षित असल्याने जास्तीत जास्त पुणेकर ऑनलाइन कर भरण्यास प्राधान्य देत आहे.

महापालिकेकडून 2015 नंतर शहरातील नागरिकांना रांगेत थांबून कर भरण्यापासून मुक्‍ती देत जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेत कर भरणा करावा यासाठी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. महापालिकेकडून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे देशात सर्वाधिक ऑनलाइन कर संकलन करणारी महापालिका म्हणून केंद्राकडून पालिकेचा गौरवही करण्यात आला आहे. त्यानंतर दरवर्षी ऑनलाइन स्वरुपात केला जाणारा करभरणा वाढतच आहे.

2018-19 मध्ये शहरातील सुमारे 7 लाख 10 हजार 80 मिळकतधारकांनी महापालिकेच्या तिजोरीत 987 कोटींचा कर जमा केला होता. त्यात सुमारे 3 लाख 30 हजार 650 मिळकतकतधारकांनी सुमारे 351 कोटी रुपयांचा करभरणा ऑनलाइन केला होता. तर हा आकडा 2019-20 या आर्थिक वर्षात वाढला. 15 जानेवारी 2020 पर्यंत शहरातील 7 लाख 68 हजार 480 मिळकतधारकांनी पालिकेच्या तिजोरीत एकूण 1,117 कोटींचा कर जमा केला असून त्यातील जवळपास 3 लाख 79 हजार 333 मिळकतधारकांनी तब्बल 441 कोटी 47 लाख रुपयांचा कर ऑनलाइन भरला आहे. त्यामुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या दरवर्षी लक्षणीयरित्या वाढत आहे.

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती मिळत आहे. सुरक्षित व्यवहार तसेच कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याने नागरिक कोठूनही एका क्‍लीकवर कर भरू शकतात. त्यामुळे ही सुविधा नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. परिणामी करसंकलनासही त्याची मोठी मदत होत आहे.
– विलास कानडे, उपायुक्‍त कर संकलन विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.