पुणे – करोनाची लागण झालेल्या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केलेल्या कॅब चालकालाही लागण झाली होती. या घटनेची शहरातील प्रवाशांनी धास्ती घेतल्याने ओला-उबेरच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. यामुळे कॅब व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे.
शहरात पहिल्यांदा आढळलेले करोनाग्रस्त रुग्ण दुबईवरून मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते कॅबने पुण्यात आले. या कॅब चालकालाही लागण झाल्याने प्रवासी कॅबने प्रवास करणे टाळत आहेत. शहरात किंवा बाहेरगावी जाण्यासाठी कॅबचा वापर होतो. मात्र, मागील आठवड्यापासून कॅबचालकांना ट्रीप पडत नाहीत. अनेक चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कॅब वाहनांवर चालतो. मात्र, सध्या व्यवसाय संकटात सापडला आहे.
मुंबई, लोणावळा ट्रीपची संख्या कमी
शहरात ओला-उबेर वाहनांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. मात्र, करोनामुळे प्रवाशांची संख्या तुरळक असल्याने कॅबचे बुकिंग होत नाही. तसेच, पुणे शहराजवळील मुंबई, लोणावळ्याला जाण्यासाठी प्रवासी नेहमीच ओला-उबेरची वाहने वापरतात. मात्र, आठवड्याभरापासून शहराबाहेरील ट्रीपही कमी झाल्याने आर्थिक गणित कोलमडल्याचे अनेक कॅब चालकांनी सांगितले.
दिवसभरात केवळ चार ते पाच ट्रीप
ओला-उबेरच्या वाहनाला दररोज सुमारे 1300 ते 1700 रुपये व्यवसाय होतो. तर, शनिवार आणि रविवार 2 ते अडीच हजारापर्यंत व्यवसाय होतो. मात्र, मागील आठवड्यापासून दिवसभरात केवळ 4 ते 5 ट्रीप पडत असल्याने दररोज 400 ते 600 रुपयांपर्यंत व्यवसाय होत आहे. तसेच, लोकल ट्रीपही बंद झाल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे विशाल साळुंखे या कॅब चालकांने सांगितले.