पुणे – शहर आणि परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. परिणामी, थंडी वाढली असून, रविवारी राज्यातील सर्वांत कमी तापमान पुण्यात नोंदवले गेले.
‘बुरेवी’ चक्रीवादळानंतर सध्या उत्तरेतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्याचा थेट परिणाम पुण्यासह राज्यातील तापमानावर झाला आहे. पुण्यात रविवारी सकाळपर्यंत किमान तपामान दोन अंश सेल्सिअसने घट होऊन 10.4 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कयम राहील, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान, अरबी समुद्र व मालदिव या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीजवळील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होणार आहे. त्यामुळे या भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.