पुण्याच्या स्थानिक विद्यार्थ्यांना 70% राखीव जागा कायम

उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांचे आश्‍वासन

पुणे – पुण्यातील विद्यार्थी व जनभावना लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणे 70 टक्के कोटा कायम ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले.

विधानसभा सदस्य अनंत गाडगीळ यांनी याप्रश्‍नी लक्षवेधी मांडली होती. सावित्रीबाई फुले विद्यापीठात गेले अनेक वर्षे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विभागांमध्ये 70 टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम होता. परंतु विद्यापीठाने पुर्व कल्पना न देता विद्यापीठाने हा नियम रद्द केला. विद्यापीठाने हा नियम रद्द केल्याने स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला असून राज्य बाहेरील विद्यार्थ्यांच्या सोईसाठी हा निर्णय घेतला असल्याचे आरोप विधान परिषद सदस्य गाडगीळ यांनी केला. त्यामुळे विद्यापीठाने 70 टक्के कोटा रद्द करण्याचा काढलेला अध्यादेश रद्द करुन पुर्वीप्रमाणेच स्थानिकांसाठीचा 70 कोटा अबाधित ठेवण्याचा निर्णय राज्यशासन घेणार का? असा प्रश्‍न विचारला. यावर राज्यमंत्री वायकर यांनी, विद्यापीठाने काढलेला नवीन अध्यादेश रद्द करुन पूर्वीप्रमाणेच सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रत्येक विभागामध्ये 70 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय पुनर्स्थापित करण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहाला दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.