क्रिकेट काॅर्नर : यंदाच्या #IPL2020 स्पर्धेवर उमटला पुणेरी ठसा

-अमित डोंगरे

अमिरातीत यंदा होत असलेल्या आयपीएल स्पर्धेवर योगायोगाने का होईना पण पुण्याचा ठसा उमटला आहे. पंच, खेळाडू, फिजिओ, ट्रेनर अशा विविध जबाबदाऱ्या पुणेकर पार पाडत आहेत.

या स्पर्धेसाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या पंच पथकात पुण्याचे बीसीसीआय पॅनेल पंच विनीत कुलकर्णी यांचा समावेश आहे. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत ज्युनिअर पंच म्हणून काम करायला 1997 साली सुरुवात केली. त्यानंतर ते बीसीसीआयची पंच परीक्षाही उत्तीर्ण झाले. अर्थात, तरीही त्यांची पॅनेलवर नियुक्‍ती झालेली नव्हती. आता मात्र गेल्या 7 वर्षांपासून ते पॅनेल पंच म्हणून कार्यरत आहेत.

भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी रणजी, विजय हजारे यांसह प्रथम दर्जाच्या अनेक स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. त्यांना एकदिवसीय सामन्यांबरोबरच आयपीएल स्पर्धेचेही सामने मिळाले. त्यात त्यांची कामगिरी नावाजली गेल्याने त्यांची आयपीएल स्पर्धेत सातत्याने पंच म्हणून नियुक्‍ती केली जात आहे.

महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय तसेच रणजीपटू केदार जाधव, दिग्विजय देशमुख, ऋतुराज गायकवाड हेदेखील या स्पर्धेत विविध संघांत आपली कामगिरी सिद्ध करत आहेत. अर्थात, दिग्विजय व ऋतुराजला यंदा आयपीएल स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली आहे. ऋतुराजने मंगळवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाकडून सहभाग घेतला.

अमिरातीत दाखल झाल्यावर करण्यात आलेल्या करोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याला विलगीकरणात राहावे लागले होते. मात्र, त्यानंतरच्या चाचण्यात तो निगेटिव्ह सिद्ध झाल्याने त्याला पदार्पणाची संधी मिळाली.

याच संघाकडून गेल्या काही वर्षांपासून केदार जाधवही कामगिरी सिद्ध करत आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजसह केदारही खेळला. मुंबई इंडियन्सकडून दिग्विजयला कामगिरी करण्याची संधी अद्याप मिळालेली नसली तरी यंदाच्या स्पर्धेत हे तीनही खेळाडू सहभागी झाले असून हे पुण्याच्या बाबतीत पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळेच देशातील अन्य राज्यातील किंवा शहरांतील खेळाडूंपेक्षा यंदाच्या स्पर्धेवर खास पुणेरी ठसा उमटला आहे. आता त्यांच्याकडून प्रेरणा घेत पुढील काळातही पुण्याचे खेळाडू जागतिक स्तरावरही यश मिळवताना दिसून येतील.

कुलकर्णींची सरस कामगिरी 

यंदाच्या स्पर्धेत पंचांच्या कामगिरीवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, त्यात विनीत कुलकर्णी यांच्याबाबत एकही तक्रार आलेली नाही. त्यांनी आपली कामगिरी उत्तमरीत्या पार पाडलेली आहे. आता येत्या काळात केवळ एकदिवसीय सामन्यांसाठी नव्हे तर आयसीसीच्या पॅनेलवरही त्यांची नियुक्‍ती करण्यात आली तर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पुण्याचीही मोहोर उमटायला वेळ लागणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.