रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा आदित्य विजेता

पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट आयोजित 18 व्या श्री महेश्‍वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या फेरीअखेर पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत याने आपली आघाडी कायम ठेवत 8 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे येथेपार पडलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. आदित्य याने किंग्स पॉन पद्धतीने खेळास सुरुवात केली व 45 चालीमध्ये मात केली.
15 वर्षीय आदित्य हा अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेत 10 वी इयत्तेत शिकत आहे. अहमदनगरच्या फिडे मास्टर सुयोग वाघ 7.5 गुणांसह 51 बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर दुसरा, तर आकाश दळवीने तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्याला 15 हजार रुपये व करंडक, उपविजेत्यास 10 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 7 हजार रुपये, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला 5 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 3 हजार रुपये अशी पारितोषिकेही देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिम्बायोसिस स्पोर्टस सेंटरचे संचालक डॉ. सतीश ठिगळे, पीडीसीसीचे सहसचिव शेखर जोरी, कल्याणी शार्पचे निवृत्त सरव्यवस्थापक चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, राजेंद्र शिदोरे आदी उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी फिडेचा नॉर्म मिळविल्याबद्दल जेजुरीच्या आर्बीटर सारिका साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.