– सुनील राऊत
पुणे – शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यातच तीन टप्प्यांत सुमारे 90 टक्के लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यात शेवटचा टप्पा 8 जूनचा होता. या दिवशी शहरातील खासगी कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्याचा शहराला किती फटका बसणार आहे, हे 13 ते 15 जूनदरम्यान समोर येणार आहे.
सध्या करोनाची लक्षणे दिसण्यास 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 8 जूननंतर शहरात वाढलेल्या गर्दीचा नेमका काय परिणाम होतो, हे समोर येणार आहे. त्यानंतरच करोनाचे संक्रमण शहरात वाढले की नाही हे समोर येणार आहे.
शहरातील करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर मागील 3 महिन्यांत करोनाबाधितांचा आकडा 8 हजारांवर गेला असून, सुमारे 5 हजारांपेक्षा जास्त जण बरे झाले आहेत. तर 400 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 2,500 जण उपचार घेत आहेत. शहरात 25 मार्चनंतर कडक लॉकडाऊन पाळण्यात आले, तरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाची रुग्णसंख्या पाच मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये लक्षणीय वाढली. ही रुग्णवाढ सातत्याने सुरूच असून नवीन झोपडपट्ट्यांमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे.
लक्षणे नसलेले रुग्ण कसे समजणार?
दरम्यान, करोना संबधित सौम्य लक्षणे दिसण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे गर्दी वाढल्याने पुढील पाच ते सात दिवसांत बाधितांचा आकडा वाढणार, की कमी होणार हे समोर येणार आहे. त्याचवेळी करोनाबाधित, मात्र लक्षणे नसलेले रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे असे रुग्ण कसे समजणार असाही प्रश्न आहे.
शहरात 8 जूननंतर बहुतांश लॉकडाऊन शिथिल झाल्याने गर्दी वाढली आहे. करोना संक्रमणाचा कालावधी लक्षात घेता, पालिकेकडून पुढील आठवड्यातील रुग्णवाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, मनपा