फिरत्या गणेश विसर्जन रथाला पुणेकरांचा प्रतिसाद

पुणे – महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकरांनी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन हौदांना प्रतिसाद दिला. यामध्ये दिवसभरात सुमारे 9 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. हे हौद महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नारळ वाढवून पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

बालगंधर्व रंगमंदिर आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमास उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक उपस्थित होते.

करोनामुळे नागरिकांनी घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र, ज्यांना ते शक्‍य नाही त्यांच्यासाठी पालिकेने 187 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांस दोन या प्रमाणे फिरते विसर्जन हौद उपलब्ध केले आहेत. त्यातील 22 विसर्जन हौद आज पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. या हौदात विसर्जनासाठी नागरिकांनी दुपारनंतर चांगला प्रतिसाद दिला. या हौदांचा मार्ग क्षेत्रीय कार्यालयांकडून निश्‍चित करण्यात आला होता. या हौदांसोबतच निर्माल्य संकलनही करण्यात येत होते. नागरिकांनी नदीकाठावर येऊन मूर्ती विसर्जन करू नये, यासाठी सर्व प्रमुख घाटांवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

मनसेचा विरोध…
या हौदांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय परिसरात लावलेला हौद थांबवून धरला. या हौदांसाठी वापरलेली टाकी कचरा संकलनाची असल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, त्याच वेळी गाडीसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत होते. मात्र, गाडी पाठवणे शक्‍य नसल्याचे सांगत क्षेत्रीय कार्यालयाने नागरिकांना घरीच गणपती विसर्जन करण्याची विनंती केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.