हौद, टाकीत मूर्ती विसर्जनाला पसंती
पहिल्या 3 दिवसांत हौद, तलावात 60% मूर्ती विसर्जन
पुणे – गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा यासाठी महापालिकेने केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पहिल्या 3 दिवसांत गणेशमूर्ती विसर्जनात 60 टक्के मूर्ती विसर्जन महापालिका हौद, पाण्याच्या टक्यांमध्ये झाले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
शहरात अर्धा दिवस, दीड दिवस तसेच तीन दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. या विसर्जनासाठी महापालिकेकडून शहरात ठिकठिकाणी तसेच विसर्जन घाटांवर पाण्याचे हौद तसेच टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नदीत अथवा विहिर तसेच कालव्याच्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना महापालिका पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन करत आहे. त्याला प्रतिसाद देत अनेक नागरिक पर्यावरपूरक विसर्जनावर भर देत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. या 3 दिवसात सुमारे 17 हजार 408 मूर्ती विसर्जन झाले असून त्यातील 10 हजार 260 मूर्ती विसर्जन टाक्या तसेच हौदात झाले आहे त्याचवेळी विसर्जन घाटांवर 1208, कॅनॉलमध्ये 2 हजार 234, तर नदीपात्रात 3433 मूर्ती विसर्जन झाले आहे. याशिवाय, शहराच्या आसपासच्या तलावात 225 तर विहिरींमध्ये 48 मूर्तींचे विसर्जन झाले आहे.
3 दिवसांत 10 टन निर्माल्य संकलन
मूर्ती विसर्जनावेळी महापालिकेकडून नदीपात्राच्या परिसरात तसेच विसर्जन घाटांवर तब्बल 10 टन निर्माल्य संकलीत केले आहे. महापालिकेने शहरात निर्माल्य संकलीत करण्यासाठी सुमारे 34 निर्माल्य कलश, 125 कंटेनर ठेवले आहेत. तर घरच्या घरी नागरिकांनी मूर्ती विसर्जन करावे यासाठी पालिकेकडून आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार टन अमोनियम बायकार्बोनेट मोफत वाटप करण्यात आले आहे.