…पण मागण्या प्रलंबितच : कोचेस वाढवण्याचीही मागणी
पुणे – पुणे-मुंबई-पुणे धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसने शुक्रवारी 29 व्या वर्षात पदार्पण केले. मात्र प्रगतीबाबतच्या प्रवाशांच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. एक्स्प्रेसचे कोच वाढवावेत, एक्स्प्रेसला पॅन्ट्री कार असावी, सिझन पासधारकांसाठी वातानुकूलित डबे असावेत, पुणे-मुंबई मार्गावर दोनपेक्षा अधिक फेऱ्या व्हाव्यात, अशा मागण्या प्रवासी अनेक वर्षांपासून होत आहे.
दि. 27 डिसेंबर 1991 पासून धावणारी “प्रगती एक्स्प्रेस’ पुणे स्टेशन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक (सीएसएमटी) दरम्यान धावणारी ही गाडी दोन शहरांतील नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे मुख्य साधन आहे. रेल्वेच्या जुन्या डब्यांची फेररचना करुन उत्कृष्ट कोचेस तयार केले आहेत. आकर्षक रंगसंगतीमुळे ही गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. यापूर्वी गाडीला निळ्या रंगाचे पारंपरिक कोचेस होते. या गाडीचे दि. 27 डिसेंबर रोजी औपचारिक उद्घाटन झाले. मात्र, ही गाडी दुसऱ्या दिवशी (दि. 28) रोजी पुणे स्थानकातून धावली. दि. 31 जुलै 2012 पासून ही गाडी कर्जत-पनवेल-दिवामार्गे वळवण्यात आली.
सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीनची प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी “प्रगती एक्स्प्रेस’ची मागणी केली होती. त्यानुसार ही गाडी धावत आहे. सध्या “प्रगती’ने शेकडो जण प्रवास करतात. प्रशासनाने प्रगती एक्स्प्रेस डेक्कन क्वीनच्या वेळात सोडल्यास प्रवाशांना अधिक फायदा होऊ शकतो. सध्याची गर्दी पाहता 17 कोचेसऐवजी एक्स्प्रेसला 21 कोचेस प्रशासनाने बसवावेत.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप