पुणेकर आणखी महिनाभर सहन करा कंबरदुखी!

खराब रस्त्यांचे होणार सर्वेक्षण; त्यानंतर सुरू होणार दुरुस्ती

पुणे – पाऊस थांबून आठवड्याभराचा कालावधी लोटला असला तरी, महापालिकेचा पथ विभाग अद्यापही सुस्तावलेलाच आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असली तरी, संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिकेस आणखी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर पुणेकरांना खड्ड्यांचा सामना करत कंबरदुखी सहन करावी लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पालिकेकडून सध्या केवळ ज्या भागातील खड्ड्यांची तक्रार येईल त्या भागातच काम करत पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यावर्षी शहरात पावसाने तब्बल 5 महिने मुक्‍काम ठोकला त्यातच, शहरात गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे जागोजागी रस्ते उखडले होते. त्यासाठी पालिकेकडून मे महिन्यात रस्ते दुरुस्तीसाठी विशेष मोहीमही हाती घेतली. मात्र, त्याच कालावधीत डांबराचा पुरवठा घटल्याने पालिकेस पावसाळ्यापूर्वी अपेक्षीत रस्ते दुरुस्ती करता आली नाही. तर यावर्षी शहरात सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परिणामी प्रमुख रस्त्यांची दाणादाण उडाली, रस्त्यांवरून नदीसारखे पाण्याचे लोट वाहत असल्याने अनेक रस्त्यांवर पालिकेकडून केलेले काम उखडून गेले. त्यानंतर गेल्या 4 महिन्यांत पावसाळ्यात कोल्ड मिक्‍स, तसेच केमीकल कॉक्रीट मिक्‍सचा वापर करून पालिकेने प्रत्येक खड्डा 3 ते 4 वेळा दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ही दुरुस्ती पावसामुळे अवघे काही तासच टिकली. त्यानंतर पावसापुढे हात टेकलेल्या पालिकेने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती पूर्णत: थांबविली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून शहरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, महापालिकेच्या पथ विभागाची विश्रांती अद्याप सुरूच असल्याने शहरातील रस्त्यांवरील खड्डे मात्र अद्यापही कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कंबरदुखी ओढावलेल्या पुणेकरांना आणखी महिनाभर रस्ते दुरुस्तीची वाट पहावी लागणार आहे.

हॉटमिक्‍स प्लांटच होता बंद
पावसामुळे महापालिकेचा हॉटमिक्‍स प्लांटच बंद ठेवल्याचे समोर आले आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेतील ओलाव्याने या प्लांटमध्ये डांबर आणि खडी मिश्रण करण्यात अडचण येत असल्याने पथ विभागाकडून हा प्लांट बंद ठेवला होता. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी पालिका पावसाळा संपल्यानंतरही कोल्डमिक्‍सच वापरत असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपासून हा प्लांट पुन्हा सुरू केला असून दैनंदिन वेळेपेक्षा तो जास्त वेळ चालविण्याची तयारी पथ विभागाने सुरू केली आहे.

तक्रार असेल तरच दुरुस्ती
पथ विभागाकडून पावसाळा थांबल्यानंतर शहरातील रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करणे आवश्‍यक होते. मात्र, सध्या पथ विभागाकडून केवळ लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून तक्रार आल्यानंतरच त्या ठिकाणी जाऊन रस्ते दुरूस्त केले जात आहेत. गेल्या 4 महिन्यांत किती रस्ते दुरुस्त केले. किती खड्ड्यांच्या तक्रारी आल्या शहरातील किती किलोमीटरचे रस्ते पावसाळ्यात खराब झाले याची कोणतीही माहिती पथ विभागाकडे नाही.

शहरातील रस्त्यांचे लवकरच सर्वेक्षण करून रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. तर पाऊस बंद झाल्याने हॉटमिक्‍स प्लांटही जादा क्षमतेने वापरून पुढील 3 आठवड्यात शहरातील रस्ते पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
– अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×