पुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर

साप्ताहिक सुटी असूनही व्यापाऱ्यांनीही दुकाने उघडली

पुणे – विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी रविवारची खरेदीची कसर भरून काढली. त्यामुळे सोमवारी साप्ताहिक सुटी असूनही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. रविवार पेठ, तुळशीबाग, लक्ष्मीरस्ता, मंडई परिसरात अक्षरश: खरेदीची झुंबड उडाली.

दिवाळी चार पाच दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्याआधीचा रविवार म्हणजे 20 ऑक्‍टोबरचा रविवार लोकांनी दिवाळी खरेदीसाठी ठेवला होता. मात्र, रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून अक्षरश: पावसाने संततधार हजेरी लावल्याने बाजारपेठांमध्ये अक्षरश: शुकशुकाट होता. मात्र सोमवारी बहुतांश कंपन्या आणि सरकारी आस्थापनांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त प्रोत्साहनपर सुटी दिल्याने हा अनेकांसाठी खरेदीचा दिवस ठरला. सकाळी मतदान करून अनेकजण खरेदी करण्यासाठी बाहेर पडले.

सकाळपासूनच ढग दाटून आले होते मात्र पाऊस नव्हता. सायंकाळी चार-पाच नंतर जोरात पाऊस येणार अशी शक्‍यता वाटल्याने सकाळीच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती.

वास्तविक तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता आणि अन्य खरेदीच्या बाजारपेठा सोमवारी बंद असतात. केवळ बोहरी आळी आणि रविवार पेठच सुरू असते; परंतु रविवारचा दिवस व्यापाऱ्यांनाही भाकड गेल्याने आणि सणासुदीचे दिवस असल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली.

खरेदीमुळे आलेल्या नागरिकांनी बाजारपेठा फुलून गेल्याने साहजिकच या भागात मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, बाजीराव रस्ता या भागात दुपारपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.