पुणे – महापालिकेकडून शहरातील मिळकतधारकांना ऑनलाईन मिळकतकराची बिले उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, त्यानंतरही पुणेकर कर भरण्यासाठी उदासिन असल्याचे समोर आले असून दिवसाला सरासरी 7 ते 8 कोटींचा कर जमा केला जात आहे. दरम्यान, मिळकतकर विभागाचे उत्पन्न मंगळवारी सायंकाळी 92 कोटी झाले आहे. तर त्यातही, पालिकेची बिले तयार होण्याआधीच काही पुणेकरांनी कर जमा केलेला असून ही रक्कम 19 ते 20 कोटी रूपयांची असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाकडून निवासी मिळकतींना महापालिका 1970 पासून देत असलेली निवासी मिळकतीची करसवलत कायम ठेवण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आला होता. मात्र, 1 एप्रिलपर्यंत त्यावर निर्णय न झाल्याने महापालिकेस 2023-24 या आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या बिलांचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यानंतर, शासनाने 23 एप्रिल रोजी ही सवलत कायम ठेवल्याचा निर्णय घेतला तसेच देखभाल दुरूस्तीची 15 टक्के सवलत कमी करत ती 10 टक्केच केली. त्यामुळे, महापालिकेस सर्वच्या सर्व साडेबारा लाख बिलांमध्ये बदल करावा लागणार होता. त्यामुळे, पालिकेने आधी कोणतेही वाद अथवा सवलत रद्द नसलेली सुमारे साडेसात लाख बिले ऑनलाईन अपडेट करून नागरिकांना उपलब्ध करून दिली आहेत. त्यातील, आतापर्यंत अवघ्या 63 हजार 215 मिळकतधारकांनी कर जमा केला आहे. त्यात, 12 हजार 878 करदात्यांनी रोख रकमेच्या स्वरूपात, 5405 कर्मचारी धनादेशाद्वारे तर 44 हजार 932 जणांनी ऑनलाईन कर जमा केला आहे.
नागरिकांना छापील बिलाची प्रतीक्षा
महापालिकेने आधी साडेसात लाख आणि नंतर गेल्या आठवडेभरात सुमारे 50 हजारांहून अधिक बिले ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. तर 17 ते 22 मे या कालावधीत महापालिका नागरिकांना छापील बिले देणार होती. मात्र, बिलांची छपाई पूर्ण झालेली नसल्याने ही बिले जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता असून त्यानंतरच कर भरणा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना ऑनलाईन बिले उपलब्ध करून दिली आहेत. त्या सोबतच, त्यांना एसएमएस तसेच छापील बिलेही देण्यात येणार असून बिलांची छपाई होताच ती तातडीनं पोस्टाकडे पाठविली जात आहे. त्यामुळे या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांना छापील बिले मिळालेली असतील.
– डॉ. अजित देशमुख, उपायुक्त, कर संकलन विभाग