पुणेकरांना “ड्रॅगन’ची भुरळ

पुणे -आरोग्यास लाभदायक असलेल्या ड्रॅगन फळांचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज तब्बल 5 ते 6 टन इतकी आवक होत आहे. ड्रॅगन फळांची आता पुणेकरांना भुरळ पडली आहे. पेशी वाढविण्यासाठी विशेषत: ड्रॅगनचे सेवन केले जाते. त्याचबरोबर डेंग्यू, दमा, कर्करोगासह इतर आजारांवर ते गुणकारी मानले जाते. त्यामुळे बाजारात ड्रॅगनची चलती असल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

विशेषत: सातारा जिल्ह्यातील फलटण, पुणे जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागांतून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल रंगाच्या ड्रॅगनला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. ड्रॅगन फळाला सध्या काही प्रमाणात ज्युस विक्रेते आणि आईस्क्रिम विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे घेऊन या फळावर प्रक्रिया करून काय करता येईल यावर विचारमंथनही केले आहे. बाजारात पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगनला प्रतीनुसार किलोस 30 ते 100 रुपये, लाल रंगाच्या ड्रॅगनला 50 ते 150 रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा ड्रॅगन पीक घेण्याकडे कल

व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, ड्रॅगनला मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आणि गोवा, गुजरात येथून जास्त मागणी आहे. मागील तीन-चार वर्षांत शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायद होत आहे. या फळाचे उगमस्थान अमेरिका आहे. अमेरिका, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. ड्रॅगन फ्रुटच्या फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.