पुणेकरांना लघुशंकेचीही चोरी

धमकावून लुटले जातायेत दागिने

पुणे – रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी थांबलेल्या नागरिकांना दमदाटी करून लुटले जात आहे. दोन दिवसांतील ही दुसरी तर, मागील काही महिन्यांतील ही पाचवी घटना आहे. “स्ट्रीट क्राईम’ करणाऱ्या गुन्हेगारांनी त्यांची मोडस बदलली असल्याचे चित्र यावरून दिसते. नुकत्याच घडलेल्या दोन्ही घटनांत सोन्याची चेन व अंगठी जबरदस्तीने काढून नेण्यात आली. यातील एक घटना सार्वजनिक शौचालयात घडली. यामुळे पुणेकरांनी रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी थांबायचे का नाही? की थेट घर गाठायचे असा प्रश्‍न पडला आहे.

लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला धमकावत 45 हजारांची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरण्यात आली. ही घटना पाषाण येथे सर्व्हिस रस्त्यालगत शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी ओंकार व्हटकर (26, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पाषाण येथून घरी जात असताना सर्व्हिस रोडला लघुशंकेसाठी थांबला होता. यावेळी दुचाकीवरून दोन व्यक्‍ती त्याच्याजवळ आल्या. त्यातील एकाने फिर्यादीला पाठीमागून पकडून “काय आहे काढ’ असे म्हणत गळ्यात हात घातला. यानंतर गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली.

सार्वजनिक शौचालयांमध्ये लघुशंकेला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची गोफ आणि अंगठी असा 96 हजारांचा ऐवज लुटला. ही घटना 3 दिवसांपूर्वी येरवडा येथील गोल्फ क्‍लब मैदानाजवळ महापालिकेच्या मुतारीत घडली होती. मधूकर चक्रनारायण (60, रा. येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चक्रनारायण हे घरातून वॉकिंगसाठी बाहेर पडले होते. घरी परतत असताना ते लघुशंकेसाठी मुतारीत गेले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी देत झटापट करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ आणि अंगठी काढून घेत पलायण केले होते. तर महिनाभरापूर्वी रस्त्यात लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाच्या डोक्‍यात दगड घालून त्याला लुटण्यात आले. त्याची दुचाकी घेऊन आरोपी पळून गेले होते. आजवर दुचाकीवरून येऊन महिलांची सोनसाखळी चोरणे, चारचाकी वाहन चालकाला अडवून धक्‍का लागल्याने अपघात झाल्याचा बहाणा करून लुटणे, पादचाऱ्यास शस्त्राचा धाक दाखवून लुटणे अशा घटना घडत होत्या. यातच लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना लुटण्याची नवी मोडस गुन्हेगारांनी शोधली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.