पुनीत बालन करंडक क्रिकेट स्पर्धा | ब्रिलियंट्‌स, हेरंब संघांची विजयी सलामी

पुणे  – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या पुनीत बालन करंडक अजिंक्‍यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंट्‌स स्पोर्टस अकादमी व हेरंब क्रिकेट अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

लिजंडस्‌ क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साईराज शेलार याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ब्रिलियंट्‌स स्पोर्टस अकादमी संघाने जस क्रिकेट अकादमी संघाचा 114 धावांनी धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. क्षितीज चव्हाण याने 70 चेंडूत 13 चौकारांसह 90 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ब्रिलियंट्‌स स्पोर्टस अकादमीने 30 षटकांत 5 गडी गमावून 174 धावांचे आव्हान उभे केले. चौथ्या गड्यासाठी क्षितीज आणि साईराज शेलार (30 धावा) यांनी 70 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. या आव्हानापुढे जस क्रिकेट अकादमीचा डाव 19.4 षटकांमध्ये 60 धावांवर आटोपला. गोलंदाजीमध्ये ब्रिलियंट्‌स संघाच्या साईराज शेलार याने 15 धावांत 3 गडी तर, आर्या कुमावत याने 5 धावांत 2 गडी बाद करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात अंगद ठाकूर याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हेरंब क्रिकेट अकादमीने गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीचा 70 धावांनी सहज पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना सार्थक बिराजदार (47 धावा), अनुज चौधरी (17 धावा) आणि यश कुंटे (16 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर हेरंब क्रिकेट अकादमीने 30 षटकात 9 गडी गमावून 124 धावा जमविल्या.

अंगद ठाकूर याच्या 17 धावात 4 बळींच्या कामगिरीमुळे गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीचा डाव 16.3 षटकात 54 धावांवर गडगडला. परिणिता पाटील ही एकमेव फलंदाज ठरली जिने दोन अंकी धावा केल्या. बाकी सर्व फलंदाज एक अंकी धावसंख्येवर बाद झाले. अंगद याच्या अनुज चौधरी (3-12) यानेही अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

संक्षिप्त धावफलक ( गटसाखळी फेरी)

1) ब्रिलियंट्‌स स्पोर्टस अकादमी : 30 षटकांत 5 बाद 174 धावा. (क्षितीज चव्हाण 90, साईराज शेलार 30, प्रेम निंबाळकर 1-19) वि. वि. जस क्रिकेट अकादमी ः 19.4 षटकात सर्वबाद 60. (ओम खुडे 13, साईराज शेलार 3-15, आर्या कुमावत 2-5). सामनावीर ः साईराज शेलार.

2) हेरंब क्रिकेट अकादमी : 30 षटकात 9 बाद 124 धावा. (सार्थक बिराजदार 47, अनुज चौधरी 17, यश कुंटे 16, अंश टिल्लू 2-17, हर्षदीप सिंग 2-18) वि. वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी ः 16.3 षटकांत सर्वबाद 54 धावा. (परिणिता पाटील 19, अंगद ठाकूर 4-17, अनुज चौधरी 3-12). सामनावीर ः अंगद ठाकूर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.