पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्कर्षा कदम हिच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सिम्हा वॉरीयर्स संघाने ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाचा 9 गडी राखून सहज पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिम्हा वॉरीयर्स आणि लिजेंडस् पॅंथर्स या संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
मुंढवा येथील लिजेंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत नाणेफेक जिंकून सिम्हा वॉरियर्स संघाने गोलंदाजी स्विकारली. ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाने सावध आणि आश्वासक सुरुवात केली. मुक्ता मगरे आणि जाई देवन्नवर (20 धावा) या दोघींनी 77 चेंडूत 63 धावांची सलामी देत संघाला सुस्थितीत पोचवले. मुक्ता हिने 49 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 43 धावांचे योगदान दिले. पण यानंतर ऑक्सिरिच संघाचे फलंदाज झटपट बाद झाले.
उत्कर्षा कदम हिने केवळ 4 धावांमध्ये 5 गडी बाद करून निम्मा संघ तंबूत पाठवला. कर्णधार सायली लोणकर हिनेही 2 गडी बाद केले. बिनबाद 63 धावा अशा सुस्थितीमधून 7 बाद 90 धावा असा गडगडला. संघाने 27 धावात 7 गडी गमावले. ऑक्सिरिच संघाचा डाव 20 षटकात 9 गडी गमावून 98 धावा निर्धारित राहीला.
सिम्हा वॉरियर्स संघाने हे आव्हान 16 षटकात व केवळ 1 गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर माया सोनावणे हिने नाबाद 44 धावा आणि कर्णधार सायली लोणकर हिच्या नाबाद 43 धावांच्या योगदानामुळे संघाने 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला.
या दोघींनी 71 चेंडूत 73 धावांची अभेद्य भागिदारी करत प्रतिस्पर्धी संघाला सामन्यामध्ये विजयाची कोणतीही संधी मिळवून दिली नाही. ऑक्सिरिच संघाचा कोणताही गोलंदाज या दोघींचा बचाव भेदू शकला नाही. सामन्याची मानकरी हा किताब सिम्हा वॉरीयर्स संघाच्या उत्कर्षा कदम हिला मिळाला.
संक्षिप्त धावफलक – 1) ऑक्सिरिच स्मॅशर्स – 20 षटकात 9 बाद 98 धावा. (मुक्ता मगरे 43, जाई देवन्नवर 20, उत्कर्षा कदम 5-4, सायली लोणकर 2-23) पराभूत वि. सिम्हा वॉरियर्स – 16 षटकात 1 बाद 99 धावा. (माया सोनावणे नाबाद 44, सायली लोणकर नाबाद 43). सामन्याची मानकरी – उत्कर्षा कदम (सिम्हा वॉरीयर्स).