पुणे – पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत भूमिका उंबरजे आणि किरण नवगिरे यांनी केलल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर लिजेंडस् पॅंथर्स संघाने एचपी सुपरनोव्हाज्चा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुंढवा येथील लिजेंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत एचपी सुपरनोव्हाज्ने अव्वल गुणस्थान प्राप्त करत तर, लिजेंडस् पॅंथर्सने उत्तम सरासरी धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आज नाणेफेक जिंकून एचपी सुपरनोव्हाजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकात 7 गडी गमावून 124 धावांचे आव्हान उभे केले. सुषमा पाटील (21), मानसी तिवारी (19), कर्णधार पूनम खेमनार (18) आणि प्रियंका घोडके (17) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला 120 धावांचा टप्पा पार करून दिला. लिजेंडस् संघाच्या शरयु कुलकर्णी (1-15), भूमिका उंबरजे (1-16) यांनी अचूक गोलंदाजी केली.
लिजेंडस् पॅंथर्सने आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. भूमिका उंबरजे आणि श्रावणी देसाई (6 धावा) या दोघींनी 48 चेंडूत 41 धावा करून लिजेंडस् संघाला दमदार सलामी मिळवून दिली. भूमिका उंबरजेने 53 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. मध्यावरती लिजेंडस् संघाची धावगती संथ झाली. यावेळी कर्णधार किरण नवगिरेने डावाची सुत्रे हाती घेत केवळ 20 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 42 धावा फटकावल्या. सामन्यामध्ये 17व्या षटकानंतर 30 धावा आणि 18 चेंडू असे समीकरण होते. एचपी संघाच्या प्रियंका घोडकेने टाकलेल्या 18 व्या षटकात किरण नवगिरेने 3 चौकार व 1 षटकारांसह 18 धावा वसूल केल्या.
अखेरच्या दोन षटकांमध्ये 12 धावांची आवश्यकता होती. पूनम खेमनारने 19वे षटक निर्धाव टाकत संघाला एक यश मिळवून देत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या षटकात लिजेंडस् संघाला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. सुषमा पाटीलने 20व्या षटकाचा पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. या फ्रि हिटचा फायदा घेत कर्णधार किरणने षटकार खेचत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर सुषमाने 3 चेंडू निर्धाव टाकत रंगत आणली. एका चेंडूमध्ये 3 धावा असे समीकरण असताना, अखेरच्या चेंडूवर किरणने षटकार खेचत लिजेंडस् संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी हा किताब भूमिका उंबरजेला मिळाला.
संक्षिप्त धावफलक –
एचपी सुपरनोव्हाज ः 20 षटकात 7 गडी बाद 124 धावा (सुषमा पाटील 21, मानसी तिवारी 19, पुनम खेमनार 18, प्रियंका घोडके 17, शरयु कुलकर्णी 1-15, भूमिका उंबरजे 1-16).
लिजेंडस् पॅंथर्स ः 20 षटकात 6 गडी बाद 127 धावा (भूमिका उंबरजे 51 (53, 6 चौकार), किरण नवगिरे नाबाद 42 (20, 5 चौकार, 3 षटकार). पूनम खेमनार 2-19, प्रियंका घोडके 2-29).