पुणे – शहरातील खूनाचे सत्र संपण्याचे नाव घेत नाही. लॉक डाऊन असतानाही खूनाच्या घटना घडत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एका तरुणाचा डोक्यात दगड व वीटा घालून खून करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज येथील मांगडेवाडीत ही घटना घडली आहे. मोहन संपत चौंडकर(32,रा.खलाटेनगर, मांगडेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्याचा डोक्यात विटा आणि दगड घालून खून करण्यात आला आहे. रात्री हा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला.
“चौंडकर हा घराशेजारी असलेल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत परिचीत व्यक्तीसमवेत दारु पित बसला होता. बराच वेळा होऊनही तो घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी तेथे धाव घेतली. तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला”.
संशयित एकाची माहिती मिळाली आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र हा खून का झाला आणि तो कोणी केला हे समजू शकलेले नाही. मोहन हा नऱ्हे येथील एका कंपनीत काम करत होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी भेट दिली.