पुणे -शहरातील मंदिरांतून दानपेटी चोरीला जाण्याचे सत्र अजूनही कायम आहे. आता चोरट्यांनी गुरुवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन मंदिरातूनही दानपेटी चोरली आहे. त्यामध्ये रोख रकमेसह 1 लाख 53 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
ही घटना दि.16 ते 17 मेदरम्यान घडली. मंदिराचे चेअरमन यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे फिर्यादी चेअरमन आहेत.
लॉकडाऊनमुळे श्री नाकोडा भैरव जैन मंदिर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी दि.16 ते 17 मे कालावधीत मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील 3 हजार रुपये आणि चांदीचा पत्रा असलेली दानपेटी असा 1 लाख 53 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे यांनी दिली आहे.