Pune ZP Election 2026 – शिरूर तालुक्यातील राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून, वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्ते मात्र मोठ्या संभ्रमात असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र करत गटातटाचे राजकारण बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात लढलेले कार्यकर्ते अजूनही मनाने एकत्र आलेले नाहीत.जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीची गणिते बदलली असून, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी (शप) पक्षाकडून इच्छुक असलेले अनेक उमेदवार बाजूला पडले आहेत. काहींनी पक्षांतर केले आहे, तर काहींनी अपक्ष म्हणून बंडखोरीचा मार्ग निवडला आहे. कवठे टाकळी हाजी गटात माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे आणि मनीषा गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे भाजपचे राजेंद्र गावडे विरुद्ध राष्ट्रवादीचे दामू घोडे असा सामना रंगणार आहे. रांजणगाव गटात तर चुलत जावांमध्येच लढत होणार असून, भाजपच्या स्वाती पाचुंदकर आणि राष्ट्रवादीच्या ज्योती पाचुंदकर आमने-सामने आहेत, त्यात शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांनी उडी घेतल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.शिक्रापूर सणसवाडी गटात राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे आणि भाजपच्या कुसुम खैरे यांच्यात थेट लढत होणार आहे. जिल्हा परिषद पुणे या गटात जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरी केली होती, मात्र त्या आता पक्षाशी एकनिष्ठ राहून अर्ज मागे घेणार असल्याचे समजते. तळेगाव रांजणगाव सांडस गटात मात्र राजकीय पेच अधिक वाढला आहे. भाजपने दिपाली गव्हाणे यांना तर राष्ट्रवादीने रेखा बांदल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे इच्छुक असलेल्या सारिका करपे यांनी शिवसेनेची साथ घेतली असून रेश्मा शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. केंदूर पाबळ गटात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल शिवले यांच्या विरोधात विकास गायकवाड यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर मैदानात उतरून आव्हान उभे केले आहे.न्हावरा आणि वडगाव रासाई या गटांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. न्हावरा गटात दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांना भाजपने उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वृषाली वाळके यांना उतरवले आहे. येथे राष्ट्रवादीतील नाराज तृप्ती सरोदे यांनी अपक्ष म्हणून बंड केले आहे. वडगाव रासाईमध्ये माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार राष्ट्रवादीचे घड्याळ घेऊन रिंगणात उतरणार आहेत, तर भाजपचे सचिन शेलार त्यांना कडवी झुंज देणार आहेत. याशिवाय दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांनी स्थानिक आघाडीची घोषणा केल्याने राजकीय संघर्ष अधिकच टोकदार झाला आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवण्याचे नेत्यांसमोर आव्हान नेत्यांनी हातमिळवणी केली असली तरी, वर्षानुवर्षे एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. पक्षांतराचा कोणाला फायदा होणार आणि कार्यकर्त्यांची नाराजी कोणाला भोवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिक्रापूर गटात कुसुम मांढरे आणि मोनिका हरगुडे यांच्यातील समझोता सुकर झाला असला तरी, इतर गटांतील नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार, याची उत्सुकता आता संपूर्ण शिरूर तालुक्याला लागली आहे.