Pune ZP Election 2026 – पाबळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, हिवरे या छोट्याशा गावातील दोन मित्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रस्थापित उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विकास गायकवाड, दीपक खैरे आणि आशा साकोरे हे सध्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत असून, मतदारांकडून त्यांच्या कामाची पावती मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या उमेदवारांना आपण काय काम केले हे सांगण्याची गरज पडत नसून, त्यांच्या निस्पृह सेवेची माहिती मतदारांपर्यंत आधीच पोहोचलेली आहे.विकास गायकवाड आणि दीपक खैरे हे दोन्ही मित्र अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आले आहेत. लहानपणीच मातृ-पितृ छत्र हरवलेल्या विकास गायकवाड यांनी परिस्थितीशी संघर्ष करत समाजकार्याला सुरुवात केली. शेकडो गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून लावून दिल्याने अनेक कुटुंबे त्यांच्याशी जोडली गेली आहेत. कोरोना काळात हजारो कुटुंबांना महिनाभर पुरेल इतका शिधा घरपोच पोहोचवणे आणि दुष्काळात स्वखर्चाने पाण्याचे टँकर पुरवणे यांसारख्या कामांमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.दुसरीकडे, दीपक खैरे यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग शेती विकासासाठी केला. ज्या भागात दुष्काळ पाचवीला पुजलेला होता, तिथे पाइपलाइनचे जाळे विणून शेतकऱ्यांना विनामूल्य पाणी उपलब्ध करून दिले. ज्या शेतात पायी जाणे कठीण होते, तिथे स्वखर्चाने रस्ते तयार केल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल आता बाजारपेठेत सहज पोहोचत आहे. याच जोडीला केंदूर भागातील आशा साकोरे आणि संपत साकोरे या दांपत्याने भाजपशी असलेली निष्ठा आणि आदिवासी मुलांसाठी केलेले काम यामुळे त्यांचाही मोठा लोकसंग्रह तयार झाला आहे.या तिन्ही उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदार स्वतःहून “तुमचे कामच बोलेल” अशी खात्री देत असल्याने राजकीय वर्तुळात या उमेदवारांची विशेष चर्चा होत आहे. कोणत्याही राजकीय हेतूशिवाय केलेल्या कामाची पावती आता निवडणुकीच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास या उमेदवारांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.