Pune ZP Election 2026 – आळे-पिंपळवंडी गटातील निवडणूक सध्या रंगात आली असली तरी प्रचाराच्या गोंगाटात मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. शिवसेना, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि बंडखोर उमेदवारांच्या संघर्षात मतदार मात्र आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. गेल्या काही वर्षांत या गटात नेमकी कोणती ठोस विकासकामे झाली, असा थेट सवाल आता गावोगावी उपस्थित केला जात असून, केवळ निवडणूक काळातच दर्शन देणाऱ्या उमेदवारांविषयी मतदारांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे.या गटातील आळेफाटा नगरीत बंदिस्त गटार योजना,सांडपाणी व्यवस्थापन, कचरा विल्हेवाट आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. जलजीवन मिशनच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवल्याने अनेक गावांमध्ये वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न, विजेचा लपंडाव आणि शेतमालाला मिळणारा भाव यांसारख्या प्रश्नांवर आश्वासनांच्या पलिकडे काहीही ठोस घडले नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तसेच, गाजावाजात जाहीर झालेली पुणे-नाशिक रेल्वे आणि माळशेज रेल्वे योजना नेमकी कुठे अडकली, यावर कोणताही उमेदवार भाष्य करण्यास तयार नाही.बिबट्यांच्या मानवी हल्ल्यांचा वाढता धोका, वाढलेली अतिक्रमणे आणि खासगी रुग्णालयातील महागडे उपचार यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. आरोग्याच्या सोयीसुविधांचा अभाव आणि ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट हे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी येणे आवश्यक असताना, उमेदवार केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, मतदार आता केवळ आश्वासन देणाऱ्याला नव्हे, तर या प्रश्नांवर ठोस उत्तरे आणि उपाययोजना देणाऱ्यालाच आपली पसंती दर्शवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.