Pune ZP Election 2026 – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटात चार दिग्गज उमेदवारांनी केलेल्या अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनामुळे हा गट सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट नाकारले गेल्याने राजेंद्र पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे हा गट आता केवळ स्थानिक राहिला नसून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा थेट संघर्षाचे मैदान बनला आहे. राजेंद्र गावडे यांच्यासह त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनीही दंड थोपटल्याने येथे चौरंगी आणि अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शिरूर शहरात कार्यकर्त्यांचा महासागर लोटला होता. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिशबाजी आणि समर्थकांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हे शक्तीप्रदर्शन एखाद्या मोठ्या प्रचार सभेसारखेच भव्य होते. जिल्हा परिषद पुणे विशेषतः राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतल्याने बेट भागातील राजकीय समीकरणांची सर्व गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही लढत आता केवळ पक्षीय राहिलेली नसून ती वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झाली आहे. या सर्व प्रक्रियेत गावडे घराण्यावर झालेल्या अन्यायाची भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. अनेक दशकांपासून सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या एका निष्ठावंत कुटुंबाला योजनाबद्धरीत्या प्रवाहाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. काही जाणकारांनी तर याला ‘राजकीय हत्या’ असे संबोधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गावडे कुटुंबाची पाळेमुळे बेट भागात घट्ट असल्याने त्यांचा हा रोष कोणाला फायद्याचा ठरणार आणि कोणाला भोवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जरी विकासकामे, पाणी आणि रस्ते हे मुद्दे प्रचारात असले, तरी ही निवडणूक प्रामुख्याने वैयक्तिक ताकद आणि अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. पारंपरिक वैराला पुन्हा धार…. राजेंद्र गावडे, दामू घोडे, बाळासाहेब डांगे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनीही आपापल्या समर्थकांची ताकद दाखवत ‘आम्हीही मैदानात आहोत’ असा स्पष्ट संदेश दिला. या चौघांचाही बेट भागात स्वतंत्र जनाधार असून, ग्रामपातळीवर त्यांच्या समर्थकांची मजबूत फळी आहे. त्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक राजकीय वजन आणि संघटनात्मक ताकदीची कसोटी ठरण्याची शक्यता अधिक आहे. भाजप–राष्ट्रवादी संघर्षाची वेगळी झलक…. राजेंद्र गावडे यांच्या अचानक भाजप प्रवेशामुळे हा गट आता केवळ स्थानिक न राहता भाजप–राष्ट्रवादी संघर्षाचे केंद्र बनला आहे. “ही निवडणूक म्हणजे आगामी राजकारणाची वेगळी रंगीत तालीम आहे,” असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचेही लक्ष या गटाकडे लागले आहे.