Pune ZP Election 2026 – शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम या गटात जाणवत असून, कोणत्याही एका बाजूला स्पष्ट कौल नसल्याने ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची ठरणार आहे. एकेकाळी एकसंध असलेली मते आता विभागली गेल्याने उमेदवारांची कसोटी लागणार आहे.या गटात राष्ट्रवादीने आपली जुनी पकड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून भाजप सत्तेच्या बळावर आणि संघटनात्मक ताकदीवर रिंगणात आहे. तर, शिवसेनेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आक्रमक प्रचार सुरू केला आहे. सध्या तरी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट आघाडी दिसत नाही, त्यामुळे उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा आणि शेवटच्या टप्प्यातील रणनीती निकालासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक मुद्द्यांवरच होणार फैसला… या गटात पाणीप्रश्न, शेतीसाठी वीज, रस्ते, रोजगार, ग्रामविकास आणि स्थानिक नेतृत्वाची उपलब्धता हे मुद्दे मतदारांसाठी अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. मोठ्या नेत्यांची नावे किंवा पक्षांची ब्रँड व्हॅल्यूपेक्षा, “आपल्या गावासाठी कोण काम करतो..?” हा प्रश्न मतदार विचारात घेत असल्याचे चित्र आहे. कामगिरी, नेतृत्व आणि मतदारांची मानसिकता ठरणार निर्णायक राजकीय अभ्यासकांच्या मते, अंतिम निकाल ठरवताना मागील कार्यकाळातील कामगिरी, उमेदवाराची प्रतिमा, गावागावातील पकड आणि मतदारांची सद्यःस्थितीतील मानसिकता निर्णायक ठरेल. कुठल्याही पक्षाला सहज विजय मिळेल, अशी स्थिती सध्या तरी नाही. कोणाची बाजू किती मजबूत? राष्ट्रवादीकडे पारंपरिक मतदार, ग्रामीण भागातील जुनी पकड आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे आहे. तर भाजपकडे संघटनात्मक बळ, सत्तेचा प्रभाव आणि केंद्र-राज्य पातळीवरील विकासाची कामे ही जमेची बाजू आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) पक्षाने शिवसेनेचा मूळ मतदार, आक्रमक प्रचार आणि स्थानिक संपर्कावर भर दिला आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार निर्णायक सध्या तिन्ही पक्षांकडून प्रचाराला वेग आला असून, घराघरात संपर्क, बैठका, गावसभा आणि शक्तीप्रदर्शन यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत कोण बाजी मारतो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.