Pune ZP Election 2026 – तालुक्यातील काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तसेच निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाॅइस चेअरमन विलास वाघमोडे यांनी थेट भारतीय जनता पार्टीतून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विलास वाघमोडे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, निरा-भीमा कारखान्याचे संचालक व व्हाॅइस चेअरमन, दूधगंगा संस्थेचे संचालक तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त, अशी अनेक जबाबदारीची पदे त्यांनी सांभाळली आहेत. सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनतेशी घनिष्ठ नाते निर्माण केले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घड्याळ या चिन्हावर एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयप्रक्रियेत कार्यकर्ते व स्थानिक नेतृत्वाला डावलण्यात आल्याची भावना अनेक गावांतून पुढे येत होती. त्याच पार्श्वभूमीवर काटी, लाखेवाडीसह १५ ते १६ गावांतील कार्यकर्त्यांनी वाघमोडे यांना भाजपकडून उमेदवारी स्वीकारण्याची जोरदार मागणी केली. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत वाघमोडे यांची उमेदवारी जाहीर केली. भाजप नेते प्रदीप गारटकर, प्रवीण माने आणि सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या पुढाकाराने ही उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर मतदारसंघात भाजपची प्रचारयंत्रणा वेगाने कार्यान्वित झाली आहे.काटी-रेडणी येथे वाघमोडेंच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्याने समोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा आत्मविश्वास ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपकडून महत्त्वाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार प्रचार करण्याच्या हालचाली सुरू असून, ही लढत लक्षवेधी ठरणारी आहे. वाघमोडेंसारख्या अनुभवी नेत्याच्या एन्ट्रीने काटी-लाखेवाडी गटातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.