पुणे : जिल्हा परिषद शाळा पीडब्लूडी विभागाने माहिती न देताच पाडली

माहिती न देताच पाडकाम, लाखो रुपयांचे नुकसान : उंड्री गाव परिसरात तणावाचे वातावरण

पुणे – सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) कोणतीही कल्पना न देता जिल्हा परिषदेची मालकी असलेल्या शाळेच्या वर्गखोल्या जमीनदोस्त केल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, असून, परस्पर शाळा पाडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. त्याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती रणजीत शिवतरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत, संबंधित ठेकेदार आणि पीडीब्लूडीच्या कार्यकारी अभियंताविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उंड्री गाव परिसरात जिल्हा परिषद मालकीची शाळा आहे. 13 वर्गखोल्या आणि शाळेला सीमाभिंत आहे. उंड्री गाव परिसरात रस्ता रूंदीकरण सुरू आहे. त्यामुळे पीडीब्लूडीने रस्त्याकडेच्या शाळेच्या चार वर्गखोल्या आणि सीमाभिंत पाडली. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यावर सर्व सूत्रे हलली.

शाळेची मालकी जिल्हा परिषदेची असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्गखोल्या पाडण्याबाबत जिल्हा परिषद किंवा पांचायत समितीला कोणतीही माहिती दिली नाही. 18 डिसेंबर रोजी शाळेला पत्र दिले आणि दहा दिवसांनी शाळा पाडणार असल्याचे सांगितले. मात्र, वेळेआधीच ही शाळा पाडली. ज्यांना अधिकार नाही, त्यांना पत्र देण्याचे कारण काय? सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

संबंधित शाळेच्या वर्गखोल्या पाडण्याबाबत जिल्हा परिषदेला कोणतेही पत्र दिले नाही. महत्त्वाचे म्हणजे या वर्गखोल्या चांगल्या स्थितीत होत्या. सीमाभिंतही पाडली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित विभाग आणि एजन्सी यांच्या विरोधात तक्रार देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांने रस्ता खोदला, तर सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळ कारवाई करते. आता त्यांनीच परस्पर शाळा पाडली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
– रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व सभापती, जिल्हा परिषद, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.