पुणे – जिल्हा परिषदेच्या तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिरूर- हवेलीतून ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, भोरमधून शंकर मांडेकर आणि खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघातून बाबाजी काळे यांचा त्यामध्ये समावेश आहे.
सन २०१७ – २०२२ या कालवधीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे तीनही सदस्य निवडून आले होते. या विधानसभा निवडणुकीत माऊली कटके आणि शंकर मांडेकर यांना अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे बाबाजी काळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते.
विधानसभा निवडणुका जाहीर होताच या तिघांनी जोरदार तयारी सुरू केली होती. त्यामुळे या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उभे असलेले उमेदवार निवडून येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके यांनी विद्यमान आमदार अशोक पवार यांचा तब्बल ७४ हजार ५५० इतक्या मताधिक्याने पराभव केला, तर बाबाजी काळे यांनीही खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दिलीप मोहिते- पाटील यांचा ५१ हजार ७४३ इतक्या मताधिक्याने पराभव केला. शंकर मांडेकर यांनी भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचा तब्बल १९ हजार ६३८ इतक्या मतांनी पराभव केला. या तीनही सदस्यांनी विधानसभेत विजय मिळवत आमदार होण्याचा मान मिळवला आहे.
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतून यापूर्वी अनेक सदस्यांनी आमदार, मंत्री म्हणून कारकीर्द गाजवली आहे. जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील पंचायती राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे. परिषदेवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रशासनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेत आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, पंचायत, समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागांसह बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा फायदा या निवडणुकीत झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेमार्फत केलेल्या कामाच्या अनुभवाचा लाभ आता त्यांना आमदारीच्या कालावधीत विविध विकासकामे करण्यासाठी होणार आहे.