पुणे : छपाई कामाचे बिल काढण्याचा मोबदला म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातील लेखापालाने 25 हजार रूपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि तडजोडीअंती 20 हजार रूपयांची लाच स्विकारली असता तो जाळ्यात अडकला.
विजय मधुकर चितोडे (वय 45, लेखापाल) याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तक्रारदार यांच्या कंपनीस पोस्ट कोविड 19 चे फॉर्म तसेच उस तोडणी कामगारांचे आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याचे काम मिळाले होते.
हे काम पूर्ण केल्यानंतर बिल काढण्याचा मोबदला म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात काम करणारे लेखापाल विजय चितोडे यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदारांने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात धाव घेत लाच मागणार्या चितोडे विरोधात अर्ज दिला.
एसीबीच्या पथकाने 17 आणि 18 मे रोजी पडताळणी केली असता चितोडे याने 25 हजारांची मागणी केली.?त्यानंतर सापळा रचून तडजोडीअंती 20 हजार रूपयांची लाच स्विकारली असता पथकाने त्यास पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.