पुणे – जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांची चाळीस रिक्त पदे आहेत. त्यापैकी पंधरा पदांवर पदोन्नती देण्यात आली. तर, अद्याप पंचवीस जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.
उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक या संवर्गातून सेवाज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली. ही प्रक्रिया समुपदेशनाद्वारे राबविण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील व माध्यमिक शिक्षण विभागातील अनुक्रमे 6 व 3 जागा रिक्त आहेत. आंबेगाव तालुक्यात 2, बारामती 1, दौंड 1, हवेली 1, इंदापूर 1, जुन्नर 2, खेड 2, मावळ 2, पुरंदर 1, शिरूर 2 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर, अद्याप पंचवीस जागा रिक्त असून त्यामध्ये आंबेगाव आणि खेडमध्ये प्रत्येकी तीन जागा रिक्त आहेत.
दरम्यान, 2012 नंतर प्रथमच पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आल्याने शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नतीची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच, या पदोन्नतीमुळे बीट पातळीवर अधिकारी उपलब्ध झाल्याने शिक्षण विभागाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत होणार आहे. उर्वरीत पदे ही पदोन्नतीच्या प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.