शेतकऱ्यांवरच बाजरी विकत घेण्याची वेळ

बारामती तालुक्‍यातील जिरायती गावांतील स्थिती; खरीप हंगाम वाया

वाघळवाडी – बारामती तालुक्‍यातील थोडाफार बागायती भाग सोडला तर जिरायती भागाकडे गेल्या पाच वर्षांपासून वरुणराजाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे पूर्णत: मोडले आहे. तालुक्‍यातील काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी जिरायती भाग अद्यापही कोरडाच आहे. तालुक्‍यात थोड्याफार झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी 100 टक्‍के म्हणजेच 6577.30 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी केली होती. मात्र, पावसाअभावी जिरायती भागातील बाजरीच्या पिकासोबतच खरीप हंगाम पूर्णत: वाया गेल्याने भाकरीसाठीही बाजरी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशाही स्थितीत परतीचा दमदार पाऊस बरसेल, या आशेवर शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात तालुक्‍यात ज्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला होता त्या ठिकाणी बाजरीचे पीक तरारले होते मात्र, सध्याच्या उष्ण वातावरणामुळे पिकाने मान टाकली असल्याने शेतकऱ्याचे डोळे पुन्हा एकदा आकाशाकडे लागले आहे. तर मका पिकाचीही अशीच परिस्थिती असल्याने जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लोणी भापकर, मोरगाव, सुपा, काऱ्हाटी या परिसरातील स्थिती गंभीर असून येथे पिण्याचे पिण्यासाठी नागरिक अद्यापही टॅंकरमागे धावत असल्याची विदारक स्थिती आहे. यंदा चांगला पाऊस पडेल असे हवामान खात्याने भाकीत केले होते, त्यामुळे बारामती तालुक्‍यातील विशेषत: जिरायती भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या, त्यानंतर पावसाने सुरुवातही बरी दिली. तर पण आता मोठ्या उघडीमुळे शेतातील पीक वाया जात असून, केलेला सर्व खर्च वाया जाणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसोबत, फळबागा, भाजीपाला यांची अवस्थाही बिकट बनली आहे. पावसाच्या भाकितामुळे बागातीयसह जिरायती भागातील अनेकांनी ऊसासारखे पीक लागवड केली होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी उधारीवरती बी व खते आणलेले असतात निसर्गाने साथ दिली नाही त्यामुळे आता उधारी कशाच्या भरवश्‍वावर चुकवायची या विवंचनेने शेतकऱ्याला ग्रासले आहे.

लोण्यासारखे मऊ माती म्हणून लोणी भापकर गावची ओळख आहे .पण या भागावर ती कायमच वरुणराजा नाराज असतो. यंदाही वरुणराजाने साथ दिली नाही, त्यामुळे बाजरीचे पीक पाण्याअभावी सुकून गेले असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.
– बाळासाहेब यादव, शेतकरी, लोणीभापकर


यंदाही बाजारी पीक हातातून गेले आहे. तसेच गोकुळआष्टमी होवून गेली तरी पावसाअभावी ज्वारीच्या पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळे पेरण्या लांबणार आहेत व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. प्रशासनाने या भागामध्ये लवकरात लवकर कृत्रिम पाऊस पाडावा.
– रवींद्र भापकर, शेतकरी, लोणीभापकर

यंदा बाजरीची 101 टक्‍के पेरणी
बारामती तालुक्‍यात 15 ऑगस्ट 2019 अखेर मंडल निहाय बाजरीची सरासरी 6455.33 हेक्‍टरवर असून एकूण पेरणी 6577.30 हेक्‍टरवर झाली आहे म्हणजेच 101.89 टक्‍के तर मका पिकाची सरासरी 1721 हेक्‍टरवर असून 1154 हेक्‍टरवर म्हणजेच 67.5 टक्‍के पेरणी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.