पुणे जि.प.चा ‘एक पुस्तक’ पॅटर्न राज्यात

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार

पुणे – विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांमध्ये सर्व विषयांचे एकच पुस्तक हा पॅटर्न राबविण्यात आला. हा पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा असल्यामुळे आता तो राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी अभ्यासक्रम तयार केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा गेली अनेक वर्षं वादाचा असणारा विषय हलका करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेने पहिली ते सातवीपर्यंत एकच पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना दिले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून आणि माजी अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या प्रयत्नातून हा प्रयोग करण्यात आला. न्यायालयानेदेखील दप्तराच्या या विषयावरून शिक्षण विभागाला वारंवार फटकारले. मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही विभागाकडे अहवाल मागितला होता. अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा अतिरिक्त संच शाळेत ठेवतात. मात्र, शासकीय शाळांना प्रत्येकवेळी हे परवडणारे नसल्याचे लक्षात आले.

पुणे जिल्हा परिषदेने मात्र बालभारतीच्या पुस्तकांबरोबरच स्वतःचा सर्व विषयांचा तिमाही अभ्यासक्रम असणारे एकच पुस्तक विद्यार्थ्यांना देऊन दप्तराचा भार हलका केला होता. त्यासाठी शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी विशेष प्रयत्न करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्याचे चांगले परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले.

पुणे जिल्हा परिषदेने राबवलेल्या पॅटर्नप्रमाणे राज्याच्या शिक्षण विभागाने आता असे धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबच एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. एकत्रित पुस्तकांप्रमाणेच पुस्तके द्विभाषिक करण्याचाही निर्णय घेतला आहे. भाषेव्यतिरिक्‍त इतर विषयांच्या पुस्तकांत संकल्पना इंग्रजीतूनही देण्यात येणार आहेत. सेमी इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके असावीत या मागणीला जोडून द्विभाषिक पुस्तकांची कल्पना विभागाच्या विचाराधीन होती. येत्या शैक्षणिक वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर अशी पुस्तके तयार केली जाणार आहे. त्यासाठी बालभारतीच्या अधिकाऱ्यांनादेखील सूचना दिल्या आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे ओझे हलके झाले आहे. विद्यार्थ्यांना दर तीन महिन्याला नवीन पुस्तकाचा आनंद मिळेल. एकाच पुस्तकात सर्व विषय वाचायला मिळणार आहेत. शिक्षकांना एकाचवेळी महिन्यातील अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.
– सुनिल कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.