पुणे – एका तरुणाची यूएईचे दिरहम देण्याचे आमिष दाखवून दोन लाखाची फसवणूक करण्यात आली. त्याच्या हातात साबणाला वर्तमानपत्राचा गठ्ठा गुंडाळून जबरदस्तीने देण्यात आला. यानंतर त्याच्याकडील दोन लाखाची रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळ काढण्यात आला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना जगताप डेअरी समोरुन थोडे पुढे गेल्यावर अप्पर कोंढवा रोडवरील साईनगर गल्ली येथे घडली. यातील फिर्यादी शेखर मुळीक (28, रा.आंबेगाव पठार) याचा कॅफेटेरीयाला खाद्य पदार्थ पुरविण्याचा व्यवसाय आहे. तर त्याचा मित्र संजय मांगडेचा हॉटेल व्यवसाय आहे.
एकदा त्याच्या मित्राच्या गाडीचालकाने रस्त्यात भेटलेल्या अनोळखी व्यक्तीने दिलेली युनायटेड अरब इमीरेटस या देशाचे दिरहम नोट दिली होती. त्या व्यक्तीने चालकास ही नोट कोठे चालत असले तर सांग असा निरोप दिला होता. त्याप्रमाणे फिर्यादीच्या मित्राने चौकशी केली असता एका दिरहमचे भारतीय चलनात 900 रुपये होतात असे कळले.
ही बाब फिर्यादीला त्याच्या मित्राने सांगितली. यानंतर फिर्यादी व त्याच्या मित्राने मोठी रक्कम देऊन दिरहम घेण्याचे ठरवले. त्यानूसार त्यांनी मोबाईलवरु आरोपीशी संपर्क साधला . आरोपी व त्याच्या साथीदाराची प्रत्यक्ष भेट झाली. यानंतर आरोपींनी दिरहम या नोटा देण्याचा बहाना करुन व्हिल कंपनीचे कपडे धुण्याचे साबनाला इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळुन, रुमालाने बांधालेला गट्टा व त्याखाली निळ्या रंगाचे जिन्सचे पॅंटचे तुकडा असलेला लाल रंगाची नायलॉनचे पिशवी,फिर्यादी यांचे जबरदस्तीने हाता मध्ये दिली.
यानंतर फिर्यादी यांचे हातातुन 500 रुपये व 2000 रुपयाचे नोटा असलेली 201000 रुपये रोख रक्कम असलेली पांढ-या रंगाची प्लॅस्टीकची पिशवी जबरदस्तीने हिस्कावली. यानंरत फिर्यादीला हाताने धक्का देवुन जमिनीवर पाडुन सदर आरोपी हे पळुन गेले आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.सी.उसगांवकर करत आहेत.