पत्नीशी भांडून निघालेला पुण्याचा युवक महाबळेश्‍वरच्या जंगलात बेपत्ता

महाबळेश्‍वर टे्रकर्सचे जवान व पोलिसांकडून जंगलात शोध

महाबळेश्‍वर – पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेल्या रोमित गजानन पाटील (वय 32, रा. रावेत, ता. हवेली, जि. पुणे) या युवकाची कार महाबळेेश्‍वरपासून चार कि.मी. अंतरावर बेवारस स्थितीत आढळून आल्याने या युवकाचा महाबळेश्‍वर येथील अंबेनळी घाटातील जंगलात महाबळेश्‍वर टे्रकर्सचे जवान व महाबळेश्‍वर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

वेगा इंडिया लेवल अँड प्रेशर मेजरमेंट प्रा. लि., फुलगाव, ता हवेली, जि. पुणे या कंपनीमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करीत असलेल्या रोमित गजानन पाटील या युवकाचे 16 जानेवारीला किरकोळ कारणावरून पत्नीशी भांडण झाले. या भांडणातून रोमित आपली मारुती कार घेवून सायंकाळी पाच वाजता घराबाहेर पडला. दोन दिवस झाले तरी तो घरी परत न आल्याने त्याच्या पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

देहूरोड पोलिसांनी रोमितचे फोटो जवळपासच्या पोलीस ठाण्यांना पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु त्याचा तपास लागला नाही. आज सकाळी महाबळेेवर पोलिसांना महाबळेश्‍वरपासून 4 कि.मी. अंतरावर अंबेनळी घाटात गेले दोन दिवसांपासून एक कार बेवारस स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. महाबळेश्‍वर पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता ही कार रावेत येथील रोमित गजानन पाटील हे चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली तसेच रोमित हे बेपत्ता असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली.

बेवारस कारबाबत महाबळेश्‍वर पोलिसांनी पाटील यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. दरम्यान ज्या भागात कार उभी आहे त्या परिसरात शोध घेण्यासाठी महाबळेश्‍वर ट्रृेकर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या जवानांनी दोन दिवस अंबेनळी घाटात संशयित ठिकाणी शोध सुरू केला. ट्रेकर्सचे जवान घाटात साधारण साडेतीनशे फूट खोल दरीत उतरून शोध घेत होते.

परंतु त्याचा कोठेही शोध लागला नाही. आज रोमित याचे मित्र व मावस भाऊ, मेव्हणे आदी नातेवाईक महाबळेश्‍वर येथे आले. त्यांनी रोमितची गाडी उघडली. त्यामध्ये एक तुटलेला मोबाईल आढळून आला. गाडीत इतर काही साहित्य नव्हते. महाबळेश्‍वर पोलिसांनी रोमितने घाटात सोडलेली गाडी नातेवाइकांच्या ताब्यात दिली. दोन दिवस शोध घेवूनही रोमितचा तपास न लागल्याने नातेवाइक रोमितची गाडी घेवून गेले अशी माहिती महाबळेश्‍वर पोलिसांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.