पुणे – …तर जीव वाचला असता

पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप


विनायक शिरसाट यांच्या नातेवाईकांचा आक्रोश


दि.30 जानेवारी रोजी आला होता शेवटचा “कॉल’

पुणे – विनायक शिरसाट हे दि.30 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचे भाऊ किशोर शिरसाट आणि नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेत विनायक यांचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पण, पोलिसांनी “मिसिंग’ची तक्रार दाखल केली. “त्याचवेळी पोलिसांनी दखल घेत तपास केला असता तर कदाचित घटना टळली असती, असा आक्रोश विनायक यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

विनायक शिरसाट हे राहत्या घरातून दि.30 जानेवारी रोजी बाहेर पडले होते. जांभूळवाडी येथे निपाणी वस्तीत त्यांची बांधकाम साईट आहे. तेथे ते गेले होते. तेथून त्यांनी घरी आई-वडिलांना कॉल करुन “दुपारी जेवायला येतो’ असे सांगितले. मात्र, दुपारनंतर परत त्यांचा कॉल आला नाही. यामुळे घरच्यांनी त्यांचा कॉल करायला प्रयत्न केला असता, मोबाइल स्विच ऑफ लागला. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता विनायक यांच्या चालकाने त्यांचे वडील सुधाकर यांना कॉल करून सांगितले, की “विनायकशेठ यांचा मला फोन आला होता. त्यांनी अर्जंट 15 लाख रुपये घेऊन ये, साहेबांना सांग,’ असे सांगितले. यानंतर सुधाकर यांनी चालकाला घरी बोलावून घेतले. त्यांनी परत विनायक यांचा मोबाइलवर कॉल केला. पण, तो स्विच ऑफ लागला. त्यावर त्यांचे मित्र ओमप्रकाश वर्मा याचाही फोन स्विच ऑफ लागला. यावर विनायक यांच्या घरच्यांनी रात्री त्यांची वाट पाहिली. यानंतर दि.31 जानेवारीला शोधाशोध केल्यावर विनायक यांची “पजेरो’ गाडी जांभुळवाडी येथील बांधकाम साईटवर लॉक केलेल्या अवस्थेत सापडली. यानंतर तातडीने घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी केवळ “मिसिंग’ची तक्रार दाखल केली. घरच्यांना विनायक यांचे अपहरण झाल्याची खात्री होती. यामुळे त्यांनी काही संघटनाच्या मदतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले. संघटनांच्या दबावानंतर अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दि.5 जानेवारीला दाखल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवारांना निलंबित करा
“अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यावर भारती विद्यापीठ पोलीस विनायक यांच्या घरच्यांना “शोध सुरू आहे,’ असे सांगायचे. त्यांनी संशयित म्हणून काही बांधकाम व्यावसायिकांची नावे दिली होती. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार हे “विनाकारण त्रास देऊ नका’ असे सांगत माघारी पाठवत होते. बांधकाम व्यावसायिक आल्यावर पवार हे स्वत: उठून त्यांना बसायला खुर्च्या देत होते. दरम्यान, मुख्य आरोपी ओमप्रकाश वर्मा याला विष्णू पवार यांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मात्र, त्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले. यानंतर ओमप्रकाश वर्मा त्याचे पूर्ण कुटूंब घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणात विष्णू पवार यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे,’ अशी मागणी विनायक यांचा भाऊ किशोर शिरसाट व विविध संघटनांच्या नेत्यांनी केली. त्यांना निलंबित केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. यामुळे ससून रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विनायक शिरसाट यांच्या घरच्यांनी काही बांधकाम व्यावसायिकांवरही संशय व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी योग्य ती दखल न घेतल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाचीही मागणी केली आहे. याप्रकरणाचा तपास नि:पक्षपणे करण्यात येईल. पोलीस अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कार्यवाही होईल.
-बच्चन सिंग, पोलीस उपायुक्‍त.

बेकायदा बांधकामांची तक्रार अंगलट?
विनायक यांनी “आरटीआय’अंतर्गत माहिती मागवून बेकायदा बांधकामांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यांनी नऱ्हे, भूगाव, आंबेगाव, शिवणे, जांभूळवाडी, उत्तमनगर, कोंढवे-धावडे आदी ठिकाणच्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. यामुळे त्यांच्या खुनामागे बिल्डर लॉबी असल्याचा संशय विनायक यांच्या घरच्यांनी केला आहे. त्यांनी काही बांधकाम व्यावसायिकांची नावेही पोलिसांनी दिली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)