पुणे – मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई भुयारी मार्गातील एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून हे काम करणारे टीबीएम तीन दिवसांपूर्वी मंडई स्थानकाच्या खालून बुधवार पेठ स्थानकाच्या बोगद्याच्या खोदाईसाठी पुढे सरकत आहे.
स्वारगेट ते मंडई हे अंतर सुमारे 1.2 किलोमीटरचे तर दुसरे टीबीएम स्वारगेटकडून मंडईच्या दिशेने सुमारे 400 मीटर अंतर पुढे गेले आहे. त्यामुळे या दोन्ही बोगद्यांची कामे वेगाने सुरू असून निश्चित केलेल्या वेळेआधीच ही कामे पूर्ण होण्याची शक्यता महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा सुमारे 5 किलोमीटरचा मेट्रोमार्ग पूर्णत: भुयारी आहे. त्यात, शिवाजीनगर, धान्य गोदाम, बुधवार पेठ आणि मंडई ही चार स्थानके आहेत. त्यातील शिवाजीनगर ते धान्य गोदामापर्यंतचे दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले.
पुढे धान्य गोदाम ते बुधवार पेठपर्यंतचे दोन्ही बोगदे पूर्ण झाले आहेत. तर, स्वारगेट ते बुधवार पेठपर्यंतचे दोन्ही बोगद्यांचे काम स्वारगेटकडून सुरू असून त्यातील एक टीबीएम मंडई स्थानकाच्या खालून बुधवार पेठच्या दिशेने पुढे गेले आहे.
मंडई ते बुधवार पेठ हे अंतर अवघे 800 मीटर आहे. तर, स्वारगेटकडून मंडईकडे जाणारे दुसरे टीबीएम सुमारे 400 मीटर पुढे गेले असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मंडई येथील शाफ्टचे काम अद्याप सुरू असल्याने बोगद्याच्या खोलीपर्यंत ते खोदलेले नाही. त्यामुळे आधी दोन्ही बोगदे पूर्ण करून नंतर टप्प्याटप्प्याने मंडईतील स्थानकाची खोदाई करून नंतर ते स्थानकाशी संलग्न करण्यात येणार आहे.