पुणे -उमेदवाराविना कॉंग्रेसने फोडला प्रचाराचा नारळ

कसबा गणपतीचे दर्शन घेत प्रचारफेरी

पुणे – उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नसतानाही ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आणि नारळ वाढवून पुणे लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रविवारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

लोकसभेसाठी युती आणि आघाडी याचे राज्यभरातील जवळपासन सर्व उमेदवार जाहीर झालेले आहेत. पुण्यात भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे, मात्र कॉंग्रेसेकडून कोणाला उमेदवारी देण्यात यावी, यावर गेल्या अनेक दिवसांपासून खलबते सुरू आहेत. कॉंग्रेसकडून अनेक नावे चर्चिली गेली, पण उमेदवार कोण? याबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये एकमत झालेले नाही. उमेदवार जाहीर झाल्यावर प्रचार सुरू केला, तर आपण प्रचारात मागे पडू म्हणून अखेर कॉंग्रेसने रविवारपासून प्रचाराचा शुभारंभ केला

यावेळी आघाडीकडून इच्छुक असलेले अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रवीण गायकवाड, ऍड. अभय छाजेड यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. आघाडीकडून लवकरच उमेदवार घोषित केला जाईल आणि आमचा उमेदवार निवडून येईल. तसेच पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल, त्याचे आम्ही काम सर्वजण करणार, असा दावा यावेळी सर्वच इच्छुक उमेदवारांनी केला.

प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांची पदयात्रा त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मार्गाने जाऊन नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ या पदयात्रेचा समारोप झाला. पदयात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उमेदवार जाहीर होईपर्यंत अशाच प्रकारे सर्वजण आपापल्या भागात जाऊन प्रचार करणार आहेत.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितुनसार, दि.2 एप्रिलला पक्षश्रेष्ठी पुण्यातील उमेदवार जाहीर करणार असून तोपर्यंत शहरातील पक्ष कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मिती करावी, असे आदेश दिल्लीवरुन आल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.